श्री तीर्थक्षेत्र देहू (dehu) हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच नजिक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते.
‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, म्हणजेच आम्हा साधकांच्या दृष्टीने या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्ताने संतश्रेष्ठ, भक्तशिरोमणी, कृपेचा सागर असणार्या, तसेच आपल्या अभंगातून सार्या ब्रह्मांडाला उद्धरण्याचे सामर्थ्य असणार्या संत तुकारामांची महती थोडक्यात देत आहे.
संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच असण्याचे उदाहरण, म्हणजेच त्यांनी सदेह वैकुंठ गमन करणे श्रीरामाने शरयु नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात, म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते; परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे (वैकुंठगमनाचे) सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते, असे म्हणावे लागेल.
संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प, म्हणजेच जीवनातील नित्य कर्मे करण्याएवढीच शिल्लक होती. बाकी सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते. पूर्णरूपी देवत्व असेच असते.
त्यांनीच वर्णन केलेल्या त्यांच्याच अभंगाच्या महतीनुसार ते किती साक्षीभूत अवस्थेत होते, हे कळते. देवच देवाला ओळखू शकतो. संत किती द्रष्टे असतात आणि ते याच भूमिकेत शिरून त्या त्या स्तरावर लिखाण करून त्यांतील अमूल्य चैतन्याद्वारे ब्रह्मांडाचा उद्धार करण्यासाठी कसे कार्य करतात, तेच यातून लक्षात येते.